पुणे प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आला असून, लवकरच त्याचा शुभारंभ होणार आहे. खोपोली ते कुसगाव दरम्यान सुमारे 13.3 किलोमीटर लांबीचा हा नवा मार्ग तयार करण्यात आला असून, यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः विकेंडच्या काळात निर्माण होणारी तीव्र वाहतूक कोंडी यामुळे लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवाशांसाठी दिलासा
मुंबईहून पुणे आणि पुढे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा प्रकल्प ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे मानले जात आहे. घाट विभागातील वळणावळणाचा मार्ग टाळून सरळ आणि वेगवान प्रवास शक्य होणार आहे. त्यामुळे इंधनाची बचत, वेळेची बचत आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अभियांत्रिकी वैशिष्ट्ये ठळक
या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. प्रकल्पात दोन भव्य बोगदे उभारण्यात आले असून, त्यातील एक बोगदा लोणावळ्याच्या खालून जातो. या बोगद्यांची रुंदी सुमारे 23.5 मीटर आहे.
तसेच पहिल्या बोगद्यानंतर 650 मीटर लांबीचा ‘एक्स्ट्रा डोस्ड केबल-स्टेड ब्रिज’ उभारण्यात आला आहे. या पुलाचा मध्यभाग सुमारे 305 मीटर लांबीचा असून, तो या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण मानला जातो. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करताना निसर्गरम्य दृश्यांचा अनुभव प्रवाशांना मिळणार आहे.
टप्प्याटप्प्याने वाहनांना परवानगी
प्रारंभी या मार्गावर केवळ हलक्या वाहनांना (कार, जीप इ.) प्रवासासाठी परवानगी दिली जाणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत वाहतुकीचा अभ्यास करून, पुढील टप्प्यात अवजड व प्रवासी वाहनांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मार्गक्रमण कसे असेल?
मुंबईहून पुण्याकडे जाताना हा मार्ग पुढीलप्रमाणे असेल – ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे – ठाणे – कळंबोली – द्रुतगती मार्ग – खालापूर टोल नाका – खोपोली एक्झिट – ‘मिसिंग लिंक’ – कुसगाव – पुणे.
टोलदर निश्चित
या नव्या ‘मिसिंग लिंक’ मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सुमारे 320 रुपये टोल आकारला जाणार आहे. विशेष म्हणजे हा टोल दर दरवर्षी सुमारे 18 टक्क्यांनी वाढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सर्वाधिक अडथळा ठरणाऱ्या घाट विभागाला पर्याय उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने ‘मिसिंग लिंक’ हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.


