संगमनेर. प्रतिनिधी
कर्करोगासारखे दुर्धर आजार मंत्रशक्तीने बरे करणे, मूल नसलेल्या स्त्रियांना मूलप्राप्ती करून देणे, तसेच घरातील सर्व समस्या दैवी शक्तीद्वारे दूर करण्याचे आमिष दाखवत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचा संगमनेर तालुक्यात पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक केली असून, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिल्यानंतर कारवाईला वेग आला. समितीच्या बुवाबाजी विरोधी विभागाच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी पोलिसांकडे सविस्तर फिर्याद नोंदवली होती. त्यानंतर संबंधितांनी समितीची बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचेही समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र बापू गडगे (रा. वडगाव पान, ता. संगमनेर) याच्यासह डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, तसेच सूरज शिंदे व मधूकर शिंदे (रा. रहिमपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवल्यानंतर श्रीरामपूर उपविभागाचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या पथकाने कारवाई करत गडगे याला ताब्यात घेतले.
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे सुरू असलेल्या या भोंदूगिरीबाबत राज्यभरातून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर चौकशीची मागणीही संबंधित यंत्रणांकडे करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तसेच ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियम, २०१३’, ‘ड्रग्स अँड मॅजिक रेमिडिज ॲक्ट’ आणि ‘मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट’ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे अंधश्रद्धा व भोंदूगिरीच्या विरोधात पुन्हा एकदा कठोर कारवाईची गरज अधोरेखित झाली असून, नागरिकांनी अशा फसव्या दाव्यांना बळी न पडण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


