सातारा प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. नगरपरिषदेच्या यशवंत उद्यान येथे पार पडलेल्या प्रमुख कार्यक्रमात बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाला उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर यांच्यासह विविध मान्यवर, नगरसेवक व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
याच प्रसंगी यशवंत उद्यानात ‘फुले-शाहू-आंबेडकर साहित्य सदन’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित हे साहित्य सदन सामाजिक प्रबोधनाचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष बनकर यांनी आपल्या भाषणात समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांनी दिलेली ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ ही त्रिसूत्री समाजाला आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून युवक-युवतींमध्ये वाचन संस्कृतीला चालना मिळून सामाजिक जाणीव अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. साताऱ्यात ज्ञानप्रसार आणि सामाजिक जागृतीचा नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळत आहे.


