सातारा प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा पत्रकार संघाच्या वतीने ‘विचारांची जयंती’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाटप करून त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला. शाहू चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पत्रकारांनी अभिवादन केले.
सातारा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव केला.
महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी आपल्या अभिवादनपर संदेशात सांगितले की, डॉ. आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ आणि ‘प्रबुद्ध भारत’ यांसारखी वृत्तपत्रे सुरू करून समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यांच्या लेखनातून सामाजिक जाणीवा आणि वंचितांच्या वेदना जगासमोर मांडल्या गेल्या.
पत्रकारांचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकरांनी जगाला परिवर्तनाचा विचार दिला. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात साताऱ्यात झाली, ही बाब सातारकरांसाठी अभिमानाची आहे. त्यांच्या शाळेतील प्रवेशदिनी ‘विद्यार्थी दिवस’ साजरा केला जातो, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमास सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, सचिव गजानन चेणगे, खजिनदार अमित वाघमारे, संघटक अजित जगताप, राहूल तपासे, तुषार तपासे, ओंकार कदम, प्रतीक भद्रे यांच्यासह शहरातील पत्रकार व छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


