सातारा / कराड प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पोटच्या लेकरावरच संशय घेत एका नराधम बापाने आपल्या चिमुकल्याला निर्दयीपणे मृत्यूच्या दाढेत ढकलल्याचे धक्कादायक वास्तव तब्बल वीस दिवसांनी समोर आले आहे. कराड तालुक्यातील शिवडे गावाजवळील कृष्णा नदी पात्रात १८ मार्च रोजी आढळलेल्या अज्ञात बालकाच्या मृतदेहाचा तपास करताना पोलिसांनी या अमानुष कृत्याचा उलगडा केला आहे.
संशयास्पद मृतदेहाने उडवली खळबळ
१८ मार्चच्या सकाळी स्थानिकांना कृष्णा नदीच्या पात्रात एका लहान मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. सुरुवातीला मृत मुलाची ओळख पटत नसल्याने तपासात अनेक अडचणी येत होत्या. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास, बेपत्ता नोंदी आणि विविध जिल्ह्यांतील माहिती यांचा आधार घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
ओळख पटली, संशयाचा धागा सापडला
सखोल तपासानंतर मृत मुलाची ओळख कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील नागठाणे गावातील सिद्धार्थ आरेकरी (वय अंदाजे ५ वर्षे) अशी पटली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी सुरू केली असता या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले. मुलाचा बाप मल्लिकार्जुन आरेकरी याच्यावरच संशयाची सुई फिरू लागली.
‘तो माझा मुलगा नाही’ विकृत संशयाचा कळस
मल्लिकार्जुन आरेकरी याला त्याच्या मित्रांकडून सतत चिडवले जात होते की, “सिद्धार्थ तुझ्यासारखा दिसत नाही.” या टोमण्यांनी त्याच्या मनात संशयाची बीजे रोवली. गेल्या दीड वर्षांपासून तो पत्नी भाग्यश्री यांच्यावर संशय घेत वारंवार भांडणे करत होता. कौटुंबिक कलह टोकाला पोहोचला आणि अखेर या संशयाने क्रौर्याचे रूप घेतले.
नियोजनपूर्वक खून
१६ मार्च रोजी आरोपीने “मुलाला शाळेत प्रवेश घ्यायचा आहे” असा बहाणा करून सिद्धार्थला विजापूरहून साताऱ्यात आणले. उंब्रज परिसरातून तो शिवडे गावाजवळील कृष्णा नदीकाठी गेला. आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून त्याने निर्दयीपणे चिमुकल्याला थेट नदीत ढकलून दिले. निरागस मुलाचा जागीच मृत्यू झाला.
२० दिवसांनी उलगडले गूढ
या घटनेनंतर आरोपीने कोणतीही तक्रार नोंदवली नव्हती. मात्र पोलिसांनी बेपत्ता मुलांच्या नोंदी, मोबाईल लोकेशन आणि साक्षीदारांच्या मदतीने तपासाचा धागा पकडला. अखेर आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या कबुलीजबाबाने संपूर्ण प्रकरणाचे गूढ उकलले.
आरोपी अटकेत; पुढील तपास सुरू
पोलिसांनी मल्लिकार्जुन आरेकरी याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही बाबींची चौकशी सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


