अकोला प्रतिनिधी
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सोमवारी सायंकाळी सत्ताधारी गटातच तीव्र वाद निर्माण झाला. सभापती विजय अग्रवाल आणि शिवसेना (शिंदे गट) सदस्य सागर भारूका यांच्यातील शाब्दिक चकमक शिवीगाळपर्यंत पोहोचताच वातावरण तापले. अखेरीस सभापतींनी भारूका यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दुपारी चार वाजता सुरू झालेल्या सभेच्या प्रारंभीच हा वाद उफाळून आला. मागील बैठकीतील एका मुद्द्याची नोंद घेण्याबाबत भारूका यांनी आग्रह धरला; मात्र ती नोंद घेऊ नये, अशी सूचना सभापती अग्रवाल यांनी दिल्याने दोघांमध्ये वादाला तोंड फुटले. संबंधित मुद्द्याची दखल घेतली नाही तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारूका यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जाते. यावर सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असे सुनावले.
या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांची सरबत्ती सुरू झाली आणि वातावरण अधिकच चिघळले. सभागृहात काही काळ गदारोळाचे चित्र निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सभापती अग्रवाल यांनी सागर भारूका यांना निलंबित करण्याची घोषणा केली व त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे निर्देश सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिले. “सभागृहात कुणाचीही दादागिरी चालणार नाही,” असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, सभागृहाबाहेर गेल्यानंतर सागर भारूका यांनी सभापतींवर मनमानी कारभाराचा आरोप करत निषेध व्यक्त केला. सत्ताधारी गटातच उफाळलेल्या या वादामुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात या घटनेची चर्चा रंगली आहे.
वादाच्या पार्श्वभूमीवर काही काळ खंडित झाल्यानंतर सभेचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. सभेत १० व २० मार्च रोजीच्या बैठकींचे इतिवृत्त कायम करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच मनपाअधिनस्त शाळांसाठी डिजिटल बोर्ड खरेदीसंदर्भातील निविदांना मान्यता देत संबंधित करारनामा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत ६५ सेवा ऑनलाइन करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेमार्फत अंमलबजावणीसाठी निविदाधारकांशी करार करण्यासही मंजुरी देण्यात आली.
सभागृहातील गोंधळ आणि त्यानंतर घेतलेले निर्णय या दोन्ही बाबींकडे आता नागरिकांचे लक्ष लागले असून, सत्ताधाऱ्यांतील अंतर्गत मतभेद पुढे आणखी तीव्र होणार का, याबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.


