पुणे प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात प्रथमच ‘पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप’ (पीपीपी) तत्त्वावर जिल्हा परिषद शाळा सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग पुणे जिल्ह्यात राबविण्यात आला आहे. महात्मा जोतिबा फुले यांचे मूळ गाव असलेल्या खानवडी येथे उभारण्यात आलेल्या ‘जोती-सावित्री जिल्हा परिषद शाळे’चे उद्घाटन शनिवारी (११ एप्रिल) सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध मंत्री, लोकप्रतिनिधी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणाच्या गुणवत्तेत मोठी झेप घडवून आणणारा हा प्रकल्प राज्यातील पहिला प्रयोग ठरणार असल्याने शिक्षण क्षेत्रात त्याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.
सीबीएसई संलग्न जिल्हा परिषद शाळा
खानवडी येथे उभारलेली ‘जोती-सावित्री जिल्हा परिषद शाळा’ ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संलग्न असलेली पुणे जिल्हा परिषदेची पहिली शाळा ठरणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनाही महानगरांतील दर्जेदार शिक्षणासारखी संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गरीब विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा
या शाळेत बालवाडीपासून बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेता येणार आहे. पहिल्या टप्प्यात बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतच्या वर्गांसाठी २६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीपासून निवासी शाळेचीही सुरुवात केली जाणार असून प्रारंभी ४० विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा सुविधा यांसारख्या आधुनिक सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी न्याहरी, भोजन, गणवेश, कपडे तसेच वाहतूक व्यवस्थाही शाळेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
१२ एकरांवर उभारलेली भव्य शैक्षणिक संकुल
खानवडी येथे राज्य शासनाने जिल्हा परिषदेला १२ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. त्यावर अत्याधुनिक शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे. वर्गखोल्या, प्रशासकीय इमारत, क्रीडा सुविधा, प्रयोगशाळा यांचे बांधकाम पूर्ण झाले असून वसतिगृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.
शाळा चालविण्यासाठी क्रिस्टल हाउस इंडिया या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेने पुणे शहर व जिल्ह्यातील पात्र शिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे. शाळेचे प्रशासकीय नियंत्रण जिल्हा परिषदेकडेच राहणार असून तज्ज्ञांचा समावेश असलेली नियामक समिती देखील नियुक्त केली जाणार आहे.
सामाजिक उत्तरदायित्वातून निधी
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उद्योग क्षेत्रातूनही मोठे योगदान मिळाले आहे. फियाट इंडिया कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत २१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद सेस निधीतून १५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या निधीतून शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे.
फुले दांपत्याच्या विचारांना आधुनिक स्वरूप
जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले की, शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता, सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास साध्य करण्याचा व्यापक प्रयत्न या प्रकल्पातून केला जात आहे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शिक्षणाच्या चळवळीला आधुनिक काळात नवे रूप देणारा हा उपक्रम ठरेल.
त्यामुळे भविष्यात राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारच्या ‘पीपीपी’ तत्त्वावरील शाळा उभारण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी
खानवडी परिसरातील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. अशा विद्यार्थ्यांना महानगरांतील महागड्या शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळणे कठीण होते. मात्र या नव्या शाळेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले की,
“ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा हा प्रयत्न आहे. डिजिटल शिक्षण, प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा आणि निवासी व्यवस्था यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.”
ग्रामीण शिक्षणाच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणारा हा प्रयोग यशस्वी ठरल्यास महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्थेला नवे बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


