मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या ‘मालिश गँग’चा पर्दाफाश करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मालीश करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून वृद्धांना डांबून ठेवत लूटमार करणाऱ्या या टोळीच्या मुसक्या शिवाजी पार्क पोलिसांनी आवळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करत होती. परिसरातील एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक हेरून, योग्य संधी साधून आरोपी मालीश करण्याचा बहाणा करत घरात प्रवेश करायचे. त्यानंतर संबंधितांना धमकावत, त्यांच्या हातपाय बांधून घरातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात येत होते.
अशाच प्रकारे शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला या टोळीने लक्ष्य केले होते. याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीनंतर शिवाजी पार्क पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाला सुरुवात झाली.
तांत्रिक पुरावे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिवाजी पार्क पोलीस ठाणे पथकाने आरोपींचा माग काढत विकास रणविर सिंग (१९), विवेककुमार शिवदंतबनारी कुमार ठाकूर (१९) तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. या टोळीने शहरातील इतर भागातही अशाच प्रकारचे गुन्हे केले असावेत, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तसेच हवालदार व पोलीस शिपाई यांच्या पथकाचा समावेश होता.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


