धुळे प्रतिनिधी
लग्न समारंभाचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या वऱ्हाडावर दुर्दैव कोसळल्याची हृदयद्रावक घटना धुळे जिल्ह्यात घडली. साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रूझर वाहनाचा भीषण अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला, तर किमान बारा जण गंभीर जखमी झाले. आनंदाच्या वातावरणात निघालेल्या या वऱ्हाडींवर अचानक ओढवलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही दुर्घटना शनिवारी (4 एप्रिल) दुपारच्या सुमारास साक्री तालुक्यातील अक्कलपाडा जवळ घडली. लग्नकार्य आटोपून शिरडाणे गावातील वऱ्हाडी तामसवाडीतून आपल्या गावी परतत होते. त्यासाठी क्रूझर (एमएच 18/ डब्ल्यू 6226) या वाहनाने प्रवास सुरू केला होता. मात्र अक्कलपाडा परिसरात अचानक समोरून हेलकावे खात येणाऱ्या वाहनाला चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला आणि क्रूझर रस्त्याच्या कडेला उलटली.
अपघात इतका भीषण होता की वाहन उलटताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही क्षणातच आनंदाच्या गजरात निघालेल्या वऱ्हाडाच्या वाहनात किंकाळ्या आणि आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित 12 जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ जखमींना वाहनातून बाहेर काढून मदतकार्य सुरू केले. त्यानंतर 108 आपत्कालीन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघातानंतर जिल्हा प्रशासनही तत्काळ सक्रिय झाले. धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. रविंद्र सोनवणे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत मदतकार्याचा आढावा घेतला. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच भाजपचे धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी धुळे सिव्हिल रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपचारांची माहिती घेतली.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना आमदार राम भदाणे म्हणाले, “शिरडाणे गावचे वऱ्हाड साक्री तालुक्यात लग्नकार्याकरिता गेले होते. परतताना त्यांच्या वाहनाचा दुर्दैवी अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच आम्ही तातडीने रुग्णालयात भेट दिली. जखमींवर उपचार सुरू आहेत. काहींना खासगी रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे. प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे.”
यावेळी त्यांनी नागरिकांना सावधगिरीचे आवाहनही केले. “लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. या काळात वऱ्हाडींची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. त्यामुळे भाड्याची वाहने घेताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वाहनचालकांनीही वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षितपणे वाहन चालवले पाहिजे. एका वाहनात अनेक कुटुंबांचे भविष्य असते. त्यामुळे सर्वांनी दक्षता बाळगली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेमुळे शिरडाणे आणि तामसवाडी या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. लग्न समारंभाच्या आनंदात सहभागी झालेल्या कुटुंबांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, साक्री पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अपघाताचे नेमके कारण काय, चालकाचा वेग किती होता आणि समोरून येणाऱ्या वाहनामुळेच अपघात झाला का, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
लग्नाच्या आनंदातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या वऱ्हाडासाठी हा प्रवास जीवघेणा ठरला. एका क्षणात सणासुदीचा माहोल दुःखात बदलल्याने धुळे जिल्हा हादरून गेला आहे.


