
धुळे प्रतिनिधी
अतिवृष्टीच्या तडाख्याने आधीच उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या स्वप्नांवर पाणी फिरत असल्याची हृदयद्रावक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे. सहा महिन्यांवर मुलीचे लग्न ठरले असताना, त्याचा खर्च कापसाच्या उत्पादनातून भागवायचा असा आशावाद बाळगलेल्या शेतकऱ्यानेच आत्महत्येचा मार्ग पत्करला.
कुरखळी (ता. शिरपूर) येथील युवराज कोळी (४०) यांनी सोमवारी आपल्या शेतातील आडव्या झालेल्या कापसाच्या पिकातच कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवले. सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने त्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले होते. शेतातील फुलोरे, कैऱ्या गळून पडलेले पाहून त्यांचे मनोधैर्य खचले. “यंदा पिकातूनच लग्नखर्च भागेल,” अशी आशा बाळगलेले कोळी या कठोर वास्तवाला तोंड देऊ शकले नाहीत.
युवराज कोळी यांचा शेतीवरच उदरनिर्वाह होता. कर्जाचा बोजा नसतानाही, पिकाच्या संपूर्ण वाट लागल्याने आणि लग्नाचा खर्च कसा उभा करणार या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
याआधी, २४ सप्टेंबर रोजी भाटपुरा (ता. शिरपूर) येथील जगदीश वंजारी (४२) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जिल्हा मध्यवर्ती बँक, भाटपुरा विकास सोसायटी, तसेच खासगी सावकार व एलआयसीकडून घेतलेले कर्ज परतफेडीच्या क्षमतेच्या कितीतरी पलीकडे गेले होते. अपेक्षित उत्पादन येण्याची शक्यता नसल्याने त्यांनीही मृत्यूला कवटाळले.
शिरपूर तालुक्यातील या दोन घटनांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या संकटाची तीव्रता समोर आणली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून, शेतकरी हताश होऊन आत्महत्येकडे वळत असल्याचे स्पष्ट होते.
“या घटनांची नोंद घेऊन चौकशीसाठी प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. आवश्यक प्रशासकीय सोपस्कार पार पाडले जातील,” असे शिरपूरचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले. दरम्यान, शेतकरी कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.