पुणे प्रतिनिधी
भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उघड केलेल्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) संदर्भात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दमानिया यांनी प्रसिद्ध केलेल्या CDR यादीत भारतीय जनता पार्टी (भाजप) चा एकही नेता नसल्याबाबत अंधारे यांनी शंका उपस्थित करत “काहीतरी गडबड असल्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे वक्तव्य केले.
शनिवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे यांनी दमानिया यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरात प्रकरणात समोर आलेल्या CDR नोंदींबाबत अधिकृत तपास यंत्रणांकडून माहिती मिळत नसताना ही माहिती दमानिया यांच्याकडे नेमकी कशी पोहोचते, हा मुख्य प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
“सीडीआर कुठून आले?”
अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणातील काही मोबाईल कॉल रेकॉर्ड बाहेर काढले, ही बाब सकारात्मक असल्याचे सांगतानाच अंधारे यांनी त्यामागील स्रोताबाबत शंका व्यक्त केली.
“विरोधकांनी वारंवार मागणी करूनही तपास यंत्रणांकडून CDR मिळत नाहीत. मात्र, अंजली दमानिया यांच्याकडे इतकी सविस्तर माहिती कशी पोहोचते? त्यांना ही माहिती नेमकी कोण पुरवत आहे?” असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक खरात यांना तब्बल १७ कॉल केल्याचे म्हटले आहे. या संदर्भात अंधारे म्हणाल्या की, जर हे कॉल झाले असतील तर त्यांचा इनकमिंग-आउटगोइंग तपशील, कॉलचा कालावधी आणि कॉलची वेळही सार्वजनिक केली पाहिजे.
“भाजपचा एकही कॉल नाही?”
अंधारे यांनी विशेषतः एका मुद्द्याकडे लक्ष वेधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, दमानिया यांनी प्रसिद्ध केलेल्या CDR यादीत भाजपमधील कोणत्याही नेत्याचा कॉल आढळत नाही.
“ज्यांनी अशोक खरात यांच्या इशान्येश्वर मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला, मंदिराच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, त्या सत्ताधारी व्यवस्थेतील एकाही व्यक्तीचा कॉल या यादीत का नाही?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
“भाजपच्या कोणत्या नेत्यांनी खरात यांच्याशी संपर्क साधला होता किंवा साधला नव्हता, याचीही चौकशी झाली पाहिजे. अन्यथा तपास एकतर्फी चालल्याचा संशय निर्माण होतो,” असे अंधारे म्हणाल्या.
SIT च्या तपासावरही प्रश्न
खरात प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले असले तरी अनेक दिवस उलटूनही तपासाची ठोस माहिती समोर येत नसल्याची टीका अंधारे यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शिवानिक ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी केली जाईल, अशी घोषणा केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही संबंधित व्यक्तींवर कारवाई झालेली नाही, असे अंधारे म्हणाल्या.
“गमे, आवारे, पोफळे यांना अजूनही ताब्यात का घेतले गेले नाही? ‘भांडे’ नावाचा अधिकारी एसआरए खात्यात का गेला होता? या सर्व बाबींचा तपास व्हायला हवा,” असेही त्यांनी सांगितले.
रुपाली चाकणकरांवरही टीका
या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या चौकशीबाबत चर्चा सुरू असतानाच अंधारे यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला.
“चाकणकर यांना समन्स निघाल्याची चर्चा झाली. मात्र त्या तीन दिवस शांत राहिल्या. अचानक त्यांनी भूमिका मांडली. या तीन दिवसांत त्यांनी तपास यंत्रणांना ‘मॅनेज’ केले का?” असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
तसेच, “या माध्यमातून चाकणकर तपास यंत्रणा आपल्या प्रभावाखाली आहेत, असा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत का?” अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
“प्रकरणाचा शेवट व्हायला हवा”
अंधारे म्हणाल्या की, या प्रकरणात अनेक महिलांच्या सन्मानाशी संबंधित गंभीर आरोप समोर आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा राजकीय वापर करण्यापेक्षा दोषींना शिक्षा होणे महत्त्वाचे आहे.
“महाराष्ट्रातील लेकींच्या अब्रूशी खेळले गेले आहे. त्यामुळे दोषींना गजाआड पाठवणे हीच खरी प्राथमिकता असायला हवी. फक्त एका व्यक्तीला लक्ष्य करून चालणार नाही, या प्रकरणात संबंधित सर्वांची चौकशी झाली पाहिजे,” असे अंधारे यांनी स्पष्ट केले.
राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे
दरम्यान, अंजली दमानिया यांनी उघड केलेल्या कथित CDR मुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांकडून अधिकृत माहिती न मिळाल्याने आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिक तीव्र होत असून, खरात प्रकरणातील पुढील घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


