पुणे प्रतिनिधी
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता पक्षीय पदाचा त्याग केल्याने या प्रकरणाचे पडसाद आणखी तीव्र झाल्याचे मानले जात आहे.
खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते… pic.twitter.com/9awsGZmgJL
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 27, 2026
गेल्या काही दिवसांपासून भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजत आहे. खरातसोबतचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर वाढत्या दबावामुळे त्यांनी सर्वप्रथम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी “वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे,” असे स्पष्टीकरण दिले होते.
दरम्यान, या प्रकरणावरून विरोधकांनी चाकणकर यांच्यावर सातत्याने निशाणा साधला होता. त्याचबरोबर पक्षांतर्गत पातळीवरही नाराजी व्यक्त होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी पक्ष नेतृत्वाकडे केल्याचेही बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर अखेर चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
सुनेत्रा पवार यांना पत्र देत राजीनामा
रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून आपला राजीनामा सादर केला आहे. त्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, “मी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकारावा.”
राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट करताना त्यांनी ही संपूर्ण परिस्थिती अत्यंत वेदनादायक असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून माध्यमे आणि राजकीय पातळीवर होत असलेल्या आरोपांमुळे आपण मानसिक त्रासातून जात असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
“गैरकृत्यांशी माझा संबंध नाही”
अशोक खरात प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे चाकणकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. “खरात प्रकरणाबाबत मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात माझा दुरान्वयेही संबंध नाही. तपासादरम्यान सत्य समोर येईल,” असे त्यांनी पत्रात नमूद केले.
तसेच कोणतेही ठोस पुरावे नसताना माध्यमांमधून होत असलेले आरोप अत्यंत वेदनादायक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, अशी मागणी त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
“मी त्याला गुरू मानले, पण कृत्यांची कल्पना नव्हती”
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चाकणकर यांनी आपली बाजू मांडताना अशोक खरातला आपण गुरू मानत असल्याचे कबूल केले होते. मात्र त्याच्या कथित गैरकृत्यांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
“जेव्हा खरातच्या कृत्यांबाबत माहिती मिळाली, तेव्हा त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती,” असेही त्यांनी सांगितले होते. तसेच आपण महिला असल्यामुळेच आपल्याला लक्ष्य करून बदनाम केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.
पक्ष नेतृत्वाची भूमिका काय?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर पुढील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी दिलेला राजीनामा पक्ष नेतृत्व स्वीकारणार का आणि पुढे महिला आघाडीचे नेतृत्व कोणाकडे दिले जाणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या या प्रकरणात रूपाली चाकणकर यांनी पक्षीय पदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही आणखी एक अडचण निर्माण झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.


