मुंबई प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या गोंधळाचे पडसाद सोमवारी थेट राज्याच्या विधान परिषदेत उमटले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच सातारा प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. या दरम्यान ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी शिंदे सेनेवर टीकेची झोड उठवत “आता हे वाघ कुठे गेले? मार खात आहेत,” असा सवाल उपस्थित केल्याने वातावरण अधिकच तापले.
सभागृहात साताऱ्यातील घटनेवरून सत्ताधारी पक्षातील मंत्री आक्रमक झाले होते. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित अरेरावीचा मुद्दा उपस्थित करत पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी केली.
या प्रकरणाची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाचा आदेश दिला. मात्र त्यानंतरही सभागृहातील वातावरण शांत न होता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच राहिली.
याच दरम्यान बोलताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी शिंदे सेनेवर थेट हल्लाबोल केला. “आता हे वाघ कुठे गेले? मंत्र्यांनाच मार खावा लागत असेल तर हा लाजिरवाणा प्रकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने धाडस दाखवत सत्तेतून बाहेर पडावे,” असे आव्हान परब यांनी सभागृहात दिले.
परब यांच्या टीकेनंतर शिंदे सेनेच्या मंत्र्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी “शेपटी घालण्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. आम्ही न्याय मागत आहोत आणि सरकारने आम्हाला न्याय द्यायलाच हवा,” असे स्पष्ट केले.
मंत्री शंभूराज देसाई यांनीही ठाकरे गटावर पलटवार करत, “सातारा जिल्हा परिषद निवडीवेळी आम्हाला कोथळे बाहेर काढण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. त्यामुळे आम्ही हतबल आहोत असे समजू नका. महायुतीत काही कटू अनुभव आले आहेत; पण विनाकारण आम्हाला डिवचण्याचे काम करू नका,” असा इशारा दिला.
दरम्यान, या मुद्द्यावरून विधान परिषदेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून सातारा प्रकरणाचे राजकीय पडसाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


