मुंबई प्रतिनिधी
वांद्रे पूर्व येथील खेरवाडी जंक्शन परिसरातील शासकीय वसाहतीकडे जाणाऱ्या सर्विस रोडवर रस्त्याच्या मधोमध पडलेला धोकादायक खड्डा अखेर प्रशासनाने बुजवला चेंबरचे झाकण तुटल्यामुळे तयार झालेल्या या खड्ड्यामुळे वाहनचालकांसाठी गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
खेरवाडी जंक्शनजवळील या सर्विस रोडवर असलेल्या चेंबरचे झाकण तुटल्याने रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा तयार झाला होता. वाहतूक मोठ्या प्रमाणावर असलेल्या या मार्गावर रात्रीच्या वेळी हा खड्डा वाहनचालकांना दिसत नसल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली होती. एका दुचाकीस्वाराचा या खड्ड्यामुळे अपघात होता होता टळल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या धोकादायक परिस्थितीबाबत ‘सातारा प्रतिनिधी’ने वृत्त प्रसिद्ध करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत स्थानिक नगरसेविका ‘रोहिणी कांबळे’ यांनी तातडीने महानगर टेलिफोन निगमच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या समस्येबाबत माहिती दिली आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
यानंतर महानगर टेलिफोन निगमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून रस्त्यातील चेंबरची दुरुस्ती केली आणि धोकादायक खड्डा बुजवून रस्ता पूर्ववत करण्यात आला.
दरम्यान, वेळेवर कारवाई झाल्यामुळे संभाव्य अपघात टळल्याचे सांगत स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


