मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्यात अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत भेसळ करताना सापडणाऱ्यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत केली. राज्यातील अन्नसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी तपासणी मोहिमा अधिक व्यापक करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानपरिषदेत शिवसेना आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी अन्नपदार्थातील भेसळीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत भाई जगताप, अनिल परब, अमोल मिटकरी आणि कृपाल तुमाने यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मंत्री झिरवाळ यांनी भेसळ करणाऱ्यांविरुद्ध थेट मकोका कारवाई करण्याचा इशारा दिला.
मंत्री झिरवाळ म्हणाले की, वसई आणि अंधेरी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात दुधातील भेसळ प्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर चार जणांना तडीपार करण्याची कार्यवाही सुरू आहे.
मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये बाहेरून येणाऱ्या दूध पुरवठ्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून अन्न व औषध प्रशासन विभागातील मनुष्यबळ वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अलीकडेच विभागात १९७ कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना प्रशिक्षणानंतर पदस्थापना देण्यात आली असल्याची माहितीही मंत्री झिरवाळ यांनी दिली. सुगंधित सुपारी प्रश्नासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


