मुंबई प्रतिनिधी
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका व मुंबईच्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. वांद्रे येथील लिलावती रुग्णालय येथे उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
अलका केरकर या वांद्रे पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ९८ मधून विद्यमान नगरसेविका होत्या. त्यांनी २०१४-१५ या कालावधीत मुंबईच्या उपमहापौरपदाची जबाबदारी सांभाळली होती. महापालिकेतील विविध नागरी सुविधा, आरोग्य व स्वच्छता विषयक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती.
नुकत्याच झालेल्या २०२६ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्या महायुतीच्या उमेदवार म्हणून वांद्रे पश्चिममधून तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. महापौरपदाच्या संभाव्य उमेदवारांमध्येही त्यांचे नाव चर्चेत होते. त्यांच्या निधनामुळे स्थानिक राजकारणात एक अभ्यासू, स्वच्छ प्रतिमेची व जनसंपर्क असलेली नेत्या हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
शिक्षण क्षेत्रातील अनुभव, साधी राहणी आणि भ्रष्टाचाराविरोधी ठाम भूमिका यामुळे त्या स्थानिक पातळीवर आदर्श नगरसेविका म्हणून ओळखल्या जात. नागरी सुधारणा, आरोग्य व स्वच्छता या विषयांवर त्यांनी सातत्याने काम केले होते. प्रभागातील नागरिकांशी त्यांचा जवळचा संपर्क होता.
भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी केरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, वांद्रे पश्चिम परिसरासाठी हे अपूरणीय नुकसान असल्याचे म्हटले. गेली तीन दशके त्यांनी पक्ष व जनतेसाठी दिलेल्या सेवेमुळे त्या नेहमी स्मरणात राहतील, असे त्यांनी सांगितले.


