मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका विवाहित महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून आणखी महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फेसबुकवर महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी ओळख वाढवत असे. त्यानंतर ऑनलाइन चॅट करत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती घेत असे. पती आणि सासूसोबत पटत नसल्याचे भाकीत करून तो संबंधित महिलेचा विश्वास जिंकत असे. विश्वास संपादन केल्यानंतर तो महिलांना कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलवत असे.
अशीच एक विवाहित महिला आरोपीच्या जाळ्यात अडकली. आरोपीने तिला मार्वे बीच येथे फिरायला बोलावले. तेथे तिच्याजवळीक साधून त्याने तिच्यासोबतचा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर त्या व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
महिलेकडून ३३ लाख रुपये उकळले
आरोपीने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित महिलेकडून तब्बल ३३ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. काही दिवसांनी आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर १८ तारखेला महिलेने आपल्या पतीला आत्महत्येचा संदेश पाठवला. त्यानंतर तिचा पती तात्काळ घरी आला. महिलेने संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर पतीने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपीला अटक
या प्रकरणी मालवणी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपी भोंदूबाबा किंवा ज्योतिषी नसून मीरा रोड येथे राहणारा ड्रायव्हर असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने फेसबुकवर ओळख करून महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि तिला ब्लॅकमेल करून ३३ लाख रुपये उकळले.
सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून त्याने इतर महिलांनाही अशाच प्रकारे फसवले आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


