मुंबई प्रतिनिधी
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीविरोधात तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठा बंदीच्या निषेधार्थ ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (१६ मार्च) जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन सकाळी १० वाजता मुलुंड रेल्वे स्टेशन (पश्चिम) परिसरात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
मुंबई काँग्रेस अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड आणि मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष व संघटन प्रभारी प्रणील नायर यांच्या निर्देशानुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केतन शहा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडणार आहे.
एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असून, व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याने हातावर पोट असलेल्या छोटे व्यावसायिक, स्टॉलधारक आणि फेरीवाले यांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे विविध आघाडी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. बेसिक काँग्रेस, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस तसेच एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते राकेश शेट्टी यांनीही सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.


