
सातारा प्रतिनिधी न्यूज नेटवर्क
दावोस : येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामील झाले आहेत. यादरम्यान महाराष्ट्रासाठी बंपर गिफ्ट मिळालं आहे.
तीन दिवसांत महाराष्ट्रासाठी 3 लाख 82 हजार कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत. गडचिरोलीत जेएसडब्ल्यू ग्रुपकडून 3 लाख कोटींची गुंतवणूक करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. गडचिरोलीला गुंतवणुकीतून जवळपास 10 हजार रोजगार निर्मिती शक्य होणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडून स्टील, रिन्युएबल एनर्जी, इन्फ्रा आणि सिमेंट, लिथियम बॅटरी आणि सोलर संदर्भात गुंतवणूकीवर भर देण्यात आला आहे. तसंच राज्यात वारे एनर्जी या हरित ऊर्जा कंपनीकडून 30 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामधून 7 हजार 500 रोजगार निर्मिती होणार आहे. टेम्बो कंपनीची देखील 1 हजार कोटींची गुंतवणूक असून 300 रोजगार निर्मिती होईल.
पहिला मान गडचिरोलीला
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारचा कल्याणी समूहाशी स्टील आणि संरक्षण क्षेत्रासंदर्भात करार झाला आहे. पोलादसाठी 5200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत केली जाणार आहे. यामधून 4000 रोजगार निर्मिती होईल असा विश्वास आहे. अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत करार केला आहे.