
मुंबई / लातूर प्रतिनिधी
लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या तुफान राड्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलली आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशा स्पष्ट शब्दांत आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 21, 2025
लातूरमधील राड्याची पार्श्वभूमी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावर असताना, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानमंडळातील वादग्रस्त व्हिडीओवर निषेध व्यक्त केला. कोकाटे रमी खेळताना आढळल्याच्या व्हिडीओवरून कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या समोर पत्ते फेकत “हे घ्या पत्ते आणि मंत्र्यांना घरी खेळायला सांगा,” असा संतप्त सवाल उपस्थित केला.
या घटनेनंतर संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत घाडगे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे राज्यभर छावा संघटना आक्रमक झाली असून सूरज चव्हाण यांच्यावर जबर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती.
अजित पवारांचा स्पष्ट संदेश: पक्षशिस्तीच्या विरोधात वर्तन सहनार नाही
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी लिहिले, “लातूरमध्ये झालेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा, असभ्य वर्तन वा असंसदीय भाषा आमच्या पक्षात चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मूल्ये लोकशाही, समता आणि बंधुत्वावर आधारित आहेत. त्या मूल्यांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार.”
पुढे ते म्हणाले, “सूरज चव्हाण यांना पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात वागल्यामुळे, त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा निर्णय पक्षशिस्त अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक होता.”
छावा संघटनेचा दबाव आणि चव्हाण यांची दिलगिरी
छावा संघटनेने सूरज चव्हाण यांच्यावर पक्षातून हकालपट्टी करून सार्वजनिक माफीची मागणी केली आहे. चव्हाण यांनी घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली, तरी पक्षश्रेष्ठींनी त्यांना माफ केलेले नाही. अजित पवारांच्या या निर्णायक पावलामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राजकारणातील शिस्तीचा एक नवा अध्याय लिहित, अजित पवार यांनी पक्षातील असहिष्णुता आणि बेकायदेशीर वर्तनाला वेस घालण्याचा निर्धार दाखवला आहे.