पुणे प्रतिनिधी
कष्ट, संघर्ष आणि जिद्दीच्या बळावर साध्या कुटुंबातील तरुणाने देशातील सर्वोच्च सेवांपैकी एक मानल्या जाणाऱ्या आयपीएस पदापर्यंत मजल मारल्याची प्रेरणादायी घटना मावळ तालुक्यात घडली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या बापूसाहेब गायकवाड यांनी नागरी सेवा परीक्षेत देशात ५६१ वा क्रमांक मिळवत आयपीएस पदासाठी पात्रता मिळवली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील साध्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई इतरांच्या घरात धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती, तर वडील बांधकाम साईटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. या परिस्थितीतही आई-वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड केली नाही.
बापूसाहेब यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी जेवणाचे डबे पोहोचवण्याचे कामही केले. पुढे त्यांनी अभियांत्रिकीचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर त्यांना एल अँड टी या नामांकित कंपनीत नोकरीची संधी मिळाली. मात्र, प्रशासन सेवेत जाण्याचे स्वप्न त्यांनी मनाशी पक्के केले होते.
त्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा देत पूर्णवेळ नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी पूर्ण करत त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. या प्रवासात अपयश, अडचणी आणि निराशेचे क्षणही आले; मात्र त्यांनी हार मानली नाही.
दरम्यान, केंद्रीय राखीव पोलिस दलात सहाय्यक कमांडंट पदाची संधी मिळूनही त्यांनी ती स्वीकारली नाही. अंतिम ध्येय नागरी सेवेत जाण्याचे असल्याने त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी नागरी सेवा परीक्षेत यश मिळवत देशात ५६१ वा क्रमांक पटकावला आणि आयपीएस पदासाठी निवड झाली.
मावळ तालुक्यातील देहूरोड येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. आई-वडिलांच्या कष्टांचे चीज झाल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंनी व्यक्त झाला.
बापूसाहेब गायकवाड यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रतिकूल परिस्थिती असूनही जिद्द, मेहनत आणि ध्येय न सोडण्याची वृत्ती असेल तर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, याचे उदाहरण त्यांच्या यशातून समोर आले आहे.


