मुंबई, प्रतिनिधी
मुंबईतील कामा रुग्णालय येथे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत प्रगत सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाच्या (ART) क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश संपादन करण्यात आले आहे. प्राथमिक वंध्यत्व आणि गंभीर द्विपक्षीय ट्यूबल ब्लॉकेज असलेल्या ३३ वर्षीय महिलेमध्ये इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) प्रक्रियेअंतर्गत भ्रूण प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. शासकीय रुग्णालयात अशा प्रकारचा प्रगत उपचार यशस्वीपणे राबविण्याची ही पहिलीच घटना मानली जात असून सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी हा मैलाचा दगड ठरत आहे.
नालासोपारा (पूर्व) येथील संबंधित महिलेला अनेक वर्षे अपत्यप्राप्ती होत नव्हती. तपासणीत दोन्ही फलोपियन ट्यूब पूर्णपणे बंद असल्याचे स्पष्ट झाले होते. तिच्या ४४ वर्षीय पतीचे वीर्यपरीक्षण सामान्य होते. पूर्वी करण्यात आलेल्या लॅप्रोस्कोपीमध्ये संपूर्ण ट्यूबल ब्लॉकेजची पुष्टी झाली होती. त्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा अशक्य ठरत असल्याने आयव्हीएफ हा एकमेव पर्याय उरला होता. पुढील वैद्यकीय तपासण्यांत हार्मोनल व अन्य सर्व चाचण्या सामान्य आढळल्या; तसेच अँट्रल फॉलिकल काउंट समाधानकारक असल्याने अंडाशयाची क्षमता चांगली असल्याचे निष्पन्न झाले.
तज्ज्ञांच्या समन्वित प्रयत्नांतून नियंत्रित अंडोत्सर्जन, अंडे संकलन, प्रयोगशाळेत फलन व भ्रूण संवर्धन या सर्व टप्प्यांनंतर २१ फेब्रुवारी रोजी भ्रूण प्रत्यारोपण प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. उपचारानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून पुढील गर्भधारणा पुष्टीसाठी आवश्यक तपासण्या नियोजित करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, भ्रूणविज्ञान तज्ज्ञ आणि प्रशिक्षित परिचारिका यांच्या संयुक्त कार्यातून साध्य झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. उपचार प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रमुख डॉक्टरांच्या पथकात डॉ. स्वाती गायकवाड (स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ), डॉ. अर्चना पाटील (प्रजनन औषधतज्ज्ञ), डॉ. रोहन देशमुख (भूलतज्ज्ञ) आणि भ्रूणविज्ञान तज्ज्ञ डॉ. नेहा कुलकर्णी यांचा समावेश होता. अत्याधुनिक भ्रूणविज्ञान प्रयोगशाळा सुविधा, नियंत्रित वातावरणीय इन्क्युबेशन प्रणाली आणि गुणवत्ताप्रमाणित ART प्रोटोकॉल यांच्या साहाय्याने ही प्रक्रिया पार पडली.
रुग्णालयाचे अधीक्षक यांनी सांगितले की, “आयव्हीएफसारखे प्रगत उपचार सहसा उच्च खर्चामुळे खासगी रुग्णालयांत मर्यादित राहतात. कामा रुग्णालयात हा उपचार यशस्वीरीत्या उपलब्ध झाल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित आणि परवडणारी वंध्यत्व उपचार सेवा मिळू शकणार आहे.”
भ्रूण प्रत्यारोपण हा आयव्हीएफ उपचारातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. प्रयोगशाळेत फलित केलेला भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयात अचूक पद्धतीने स्थापित केला जातो. ट्यूबल अडथळ्यांमुळे नैसर्गिक गर्भधारणा अशक्य असलेल्या महिलांसाठी ही पद्धत प्रभावी पर्याय ठरते. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत या उपचाराची सुरुवात झाल्याने वंध्यत्वग्रस्त दाम्पत्यांसाठी मोठा दिलासा मिळणार असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील ही प्रगत पायरी केवळ वैद्यकीय यश नसून ‘सर्वांसाठी समतोल आरोग्यसेवा’ या संकल्पनेच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल असल्याचे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतही सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान सुविधा विकसित करण्याचा मार्ग या यशामुळे मोकळा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


