स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई: वांद्रे टर्मिनस येथे लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपी) शनिवारी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली असून, ‘अवध एक्स्प्रेस’च्या जनरल डब्यातून सुमारे १३ कोटी ८३ लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
शनिवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी ६ च्या सुमारास ही गाडी वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. रेल्वेची नियमित विद्युत देखभाल तपासणी (ईएमसी) सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मंगवा आणि रेल्वे कर्मचारी अल्ताफ यांना मागील जनरल डब्यात एक बेवारस जड काळी बॅग दिसून आली. संशय बळावल्याने त्यांनी ही बॅग बाहेर काढून तपासली असता, त्यात कपड्यांखाली तपकिरी टेपने गुंडाळलेली अनेक पाकिटे लपवल्याचे आढळले.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ आरपीएफ निरीक्षक एस. प्रभाकर राव आणि वांद्रे जीआरपीच्या टीमसह आरपीएफ आणि जीआरपी श्वान पथके तसेच फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (एफएसएल) पथकाला पाचारण करण्यात आले. आरपीएफच्या स्निफर डॉगने बॅगेत अंमली पदार्थ असल्याचे सूचित केल्यानंतर, एफएसएल टीमने सीसीटीव्ही देखरेखीखाली ही बॅग उघडली.
त्यामध्ये एकूण ३१ पाकिटांमध्ये १२.८३४ किलो वजनाचे ड्रग्ज लपवण्यात आले होते. या बॅगेत दोन शर्ट आणि एक जीन्सदेखील पोलिसांना सापडली आहे. याप्रकरणी वांद्रे जीआरपीने अज्ञात व्यक्तींविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे तस्करांचा शोध सुरू आहे.


