बदलापूर प्रतिनिधी
बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या कथित अंडाशय तस्करी प्रकरणात धक्कादायक बाबी समोर येत असून सुमारे ३०० हून अधिक महिलांना पैशांचे आमिष दाखवून बेकायदेशीर वैद्यकीय प्रक्रियांना सामोरे जावे लागल्याचा संशय तपासातून व्यक्त होत आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुलक्षणा गाडेकर हिला अटक करण्यात आली असून तिच्या माध्यमातून आंतरराज्यीय जाळे कार्यरत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
तपास यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गरिब व असुरक्षित परिस्थितीत असलेल्या महिलांना प्रत्येकी सुमारे २० हजार रुपये देण्याचे आश्वासन देऊन त्यांची अंडाशये काढून घेण्याची बेकायदेशीर साखळी राबवली जात होती. या प्रक्रियेसाठी महिलांना तयार करणाऱ्या मध्यस्थांना प्रत्येकी सुमारे ३ हजार रुपये दिले जात असल्याचेही समोर आले आहे. काढण्यात आलेली अंडाशये केरळ, तामिळनाडू, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतील काही केंद्रांमध्ये विक्रीसाठी पाठवली जात असल्याचा संशय तपासात व्यक्त केला जात आहे. अधिकृतरीत्या मात्र पोलिसांनी या बाबत मौन बाळगले आहे.
या प्रकरणात गाडेकरसह उल्हासनगरमधील तिच्या दोन साथीदार महिलांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान गाडेकर बदलापूरमधील खरवई परिसरातील ‘नॅनो सिटी’मधील एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. महिनाभरापूर्वीच ती येथे राहायला आली होती. पोलिसांनी फ्लॅटची झडती घेतली असता संशयास्पद इंजेक्शन्स, सोनोग्राफी अहवालांचे छायाचित्रे, महिलांची छायाचित्रे, खोटी प्रतिज्ञापत्रे व वैद्यकीय कागदपत्रांचा साठा जप्त करण्यात आला.
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महिलांच्या शरीरात बीजवृद्धीसाठी वापरली जाणारी हार्मोनल इंजेक्शन्स गाडेकर स्वतःकडे ठेवत असे. वैद्यकीय सल्ल्याविना ती संबंधित महिलांना इंजेक्शन्स देत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर बेकायदेशीर सोनोग्राफी करून त्यांना आयव्हीएफ केंद्रांकडे पाठवले जाई. तेथे शस्त्रक्रियेद्वारे अंडाशय काढले जाऊन त्याची पुढील विक्री केली जात असल्याचा संशय आहे.
या प्रकरणात बेकायदेशीर वैद्यकीय पद्धती, मानव अवयव तस्करी व महिलांची फसवणूक अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. आंतरराज्यीय दुवे तपासण्यासाठी पोलिसांकडून विविध राज्यांतील आरोग्य यंत्रणांशी संपर्क साधला जात आहे.
दरम्यान, या कथित रॅकेटमुळे प्रभावित झालेल्या महिलांची नेमकी संख्या, त्यांचे आरोग्य व पुढील वैद्यकीय मदत याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तपासाची व्याप्ती वाढत असून आणखी अटकांची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही.


