मुंबई : प्रतिनिधी
मुंबई | धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या गेट क्रमांक २ जवळ रविवारी दुपारी साडेपाच फूट लांबीचा अती-विषारी नाग आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, सर्पमित्राने दाखवलेल्या तत्परतेमुळे या नागाला सुरक्षितरीत्या रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
आज दुपारी २:४५ च्या सुमारास निसर्ग उद्यानाच्या प्रवेशद्वार क्रमांक २ जवळील दगडांच्या भेगांमध्ये एक महाकाय नाग अडकून बसल्याचे सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आले. सापाची लांबी आणि त्याचा फणा पाहून प्रत्यक्षदर्शींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची माहिती तात्काळ ‘वापरा’ संस्थेचे सर्पमित्र अतुल कांबळे यांना देण्यात आली.
वनविभागाची मदत आणि रेस्क्यू ऑपरेशन
घटनेचे गांभीर्य ओळखून सर्पमित्र अतुल कांबळे यांनी तात्काळ स्थानिक राऊंड ऑफिसर संदीप टोकरे आणि वनविभागाच्या नियंत्रण कक्षाला (Forest Control) ला कल्पना दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल होत कांबळे यांनी मोठ्या कौशल्याने दगडाच्या भेगांत अडकलेल्या ५.५ फुटी नागाला कोणतीही इजा न होता बाहेर काढले.
नैसर्गिक अधिवासात सुटका
हा नाग अती-विषारी प्रजातीचा असल्याने त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. वनविभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे (Guidelines) पालन करून, या नागाची रीतसर नोंद करण्यात आली. त्यानंतर त्याला मानवी वस्तीपासून दूर त्याच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या मुक्त करण्यात आले. सर्पमित्र आणि वनविभागाच्या या यशस्वी कामगिरीमुळे एका वन्यजीवाला जीवदान मिळाले असून नागरिकांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.


