जालना प्रतिनिधी
शहरातील बसस्थानक मार्गावरील दोन लॉजमध्ये सुरू असलेल्या देहव्यापारावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत सात पुरुषांना अटक केली, तर १३ महिलांची सुटका करण्यात आली. शुक्रवारी उशिरा रात्री ही कारवाई करण्यात आली.
पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बसस्थानक मार्गावरील वैष्णवी लॉज व मोक्ष लॉज येथे बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने दोन्ही ठिकाणी छापा टाकला.
कारवाईदरम्यान मोक्ष लॉजचे मालक सचिन नंदू पवार (रा. वाटूर, ता. परतूर, जि. जालना), व्यवस्थापक संतोष भोलेनाथ जाधव (रा. खरपुडी, जि. जालना) तसेच वैष्णवी लॉजचे व्यवस्थापक कैलास रतनकुमार (मूळ रा. सावा, जि. चित्तौडगड, राजस्थान) यांच्यासह ग्राहक म्हणून आलेले पंकज भाऊसाहेब निकाळजे, रोहित संजय बोर्डे, करण रवी वाहुळे व तुषार हरिश बत्रा यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून ८१ हजार ७५० रुपयांची रोकड व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईत १३ महिलांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी सहा महिला पश्चिम बंगालमधील, तीन आसाममधील आणि चार छत्रपती संभाजीनगर येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्व महिलांना संरक्षणासाठी संबंधित यंत्रणेकडे सोपविण्यात आले आहे.
याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ व ६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.


