मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील फेरीवाल्यांची संपूर्ण नोंद, परवाने, ओळखपत्रे आणि वास्तव्यासंदर्भातील कागदपत्रांची तात्काळ पडताळणी करण्याचे आदेश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले. अनधिकृत वास्तव्यासंदर्भातील वाढत्या तक्रारी आणि बोगस जन्मप्रमाणपत्र प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रे वितरित झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून या प्रकरणातील जबाबदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत आठ जणांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले असून दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये सोमवारपासून पुढील कारवाई होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापौर दालनात झालेल्या आढावा बैठकीस उपमहापौर, संबंधित गटनेते, माजी खासदार किरिट सोमय्या, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तावडे यांनी सांगितले की, पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्याचे जन्मप्रमाणपत्र, आधारकार्ड आणि इतर शासकीय ओळखपत्रांची काटेकोर तपासणी करण्यात येईल. अवैध कागदपत्रे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
बांगलादेशी नागरिकांकडून अवैधरित्या व्यवसाय केल्याच्या तक्रारींबाबत पूर्वीच पुरावे सादर करण्यात आले होते; मात्र अपेक्षित कारवाई झाली नसल्याची खंत व्यक्त करत, यापुढेही विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात सभागृहात प्रस्ताव मांडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येमुळे पदपथांवरील अतिक्रमण आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याचे नमूद करत, महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले. बोगस प्रमाणपत्र वितरणात सहभागी डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही भागांत तपासणीदरम्यान मोठ्या संख्येने संशयित फेरीवाले आढळल्याचा दावा करण्यात आला असून त्यांच्या कागदपत्रांची सखोल छाननी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महिनाभरात सर्व प्रकरणांचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.


