मुंबई प्रतिनिधी
मुंबईची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवांमध्ये १९ फेब्रुवारीपासून वाढ होणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन १२ एसी आणि ३ नॉन-एसी अशा एकूण १५ अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
सध्या पश्चिम रेल्वेमार्गावर १,४१४ एसी व नॉन-एसी लोकल गाड्या धावतात. नव्या बदलांनंतर एसी लोकल सेवांची संख्या १२१ वरून १३३ वर जाणार आहे. यापैकी ११ एसी सेवा विद्यमान नॉन-एसी गाड्यांच्या जागी चालविण्यात येणार असून, एक सेवा पूर्णपणे नवी असेल. त्याचबरोबर तीन नव्या नॉन-एसी सेवांची भर घालण्यात येणार आहे. एकूण लोकल सेवांची संख्या १,४१० वरून १,४१४ इतकी होणार आहे.
आठवड्याच्या शेवटी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन शनिवार-रविवारी धावणाऱ्या एसी लोकलची संख्या ७७ वरून १०६ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. तसेच सध्या भाईंदर–वांद्रे दरम्यान धावणारी धीम्या गतीची लोकल सेवा आता विरारहून सुरू होणार असल्याने उत्तरेकडील उपनगरांतील प्रवाशांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध होईल.
दरम्यान, होळी व उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर दूरवरच्या प्रवासासाठीही विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते प्रयागराज दरम्यान आठवड्यातून विशेष गाड्या चालविण्यात येणार असून १७ फेब्रुवारी ते १४ जुलै २०२६ या कालावधीत सेवा उपलब्ध राहील. ट्रेन क्रमांक ०४१०२ (एलटीटी–प्रयागराज) ही साप्ताहिक विशेष गाडी दर मंगळवारी सायंकाळी ४.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता प्रयागराज येथे पोहोचेल.
या गाडीला कल्याण, इगतपुरी (०४१०२ साठी), नाशिक, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर या स्थानकांवर थांबे असतील. एसी-२ टियर, एसी-३ टियर, स्लीपर, जनरल सेकंड क्लास व सेकंड सीटिंग अशा विविध श्रेणींची सोय करण्यात आली आहे. आरक्षणाची सुविधा १४ फेब्रुवारीपासून संगणकीकृत आरक्षण केंद्रे तसेच IRCTCच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
लोकल सेवांमधील ही वाढ गर्दी कमी करण्यास आणि प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी करण्यास मदत करेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.


