मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील वर्सोवा परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैधरित्या भारतात दाखल झाल्याचा आरोप असलेल्या २१ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये १८ ट्रान्सजेंडर व्यक्ती, एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वर्सोवा पोलिसांनी अंधेरी पश्चिम येथील यारी रोड आणि माहीम परिसरात धाडी टाकून ही कारवाई केली. पोलिसांच्या ‘एटीसी’ पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संबंधित व्यक्ती कोलकाता मार्गे मुंबईत आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून बांगलादेशी नागरिकत्वाचे काही कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, मुंबई महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनधिकृत वास्तव्य आणि फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांबाबत कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महापौरांच्या सूचनेनंतर मागील चार महिन्यांत तब्बल २७६ बनावट जन्मप्रमाणपत्रांची प्रकरणे उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणांत पालिका अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत अधिकाऱ्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून संबंधित व्यक्तींची कागदपत्रे आणि भारतातील वास्तव्याबाबतची माहिती पडताळून पाहिली जात आहे.


