सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना यांच्यात थेट लढत झाल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेना गटाने स्पष्ट बहुमत मिळवत पंचायत समितीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सातपैकी सहा गट, तसेच पंचायत समितीच्या १४ पैकी १३ गणांवर देसाई गटाने विजय मिळवला. मतदारांनी विकासकामांना आणि स्थानिक नेतृत्वाला पसंती दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
देसाई–पाटणकर पारंपरिक संघर्षाला नवे वळण
पाटण तालुक्यात गेली चार–पाच दशके देसाई आणि पाटणकर गटातील राजकीय संघर्ष केंद्रस्थानी राहिला आहे. यंदा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजित पाटणकर यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोडून भाजपात प्रवेश केल्याने या लढतीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. भाजपाच्या तिकिटावर उभ्या असलेल्या उमेदवारांसाठी पाटणकर गटाने मोठी ताकद लावली; मात्र निकालात त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही.
भाजपाचा प्रचार, पण मतदारांचा कौल वेगळा
भाजपाकडून प्रचारासाठी मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, गणेश नाईक, चित्रा वाघ यांच्यासह अनेक नेते तालुक्यात दाखल झाले होते. मात्र या प्रचार मोहिमेला मतदारांकडून मर्यादित प्रतिसाद मिळाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
आरोप–प्रत्यारोपांच्या पलीकडे विकासाचा मुद्दा
प्रचारादरम्यान पालकमंत्रीपद आणि निधीवाटपावरून आरोप–प्रत्यारोप झाले. “तालुक्याच्या विकासकामांवर परिणाम होणार नाही,” असे वक्तव्य करत भाजप नेत्यांनी देसाईंना लक्ष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना देसाईंनी विकासकामांवरच जनतेचा कौल मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. निकालाने तो विश्वास बळकट केला आहे.
पंचायत समितीतील विजयी उमेदवार
(बहुसंख्य गणांमध्ये शिवसेना–शिंदे गटाचे वर्चस्व कायम राहिले असून भाजपाला केवळ एका गणात यश मिळाले.)
जिल्हा परिषदेतही देसाई गट आघाडीवर
जिल्हा परिषदेच्या सहा गटांमध्ये शिंदेसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवत तालुक्यातील राजकीय वर्चस्व अधोरेखित केले आहे. भाजपाला केवळ म्हावशी गटात समाधान मानावे लागले.
एकूणच, पाटण तालुक्यातील निकालाने शंभूराज देसाई यांचे स्थान अधिक मजबूत झाले असून, भाजपात प्रवेश केलेल्या पाटणकर गटास अपेक्षित यश न मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


