सातारा प्रतिनिधी
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्ह्यावर असलेला दीर्घकाळचा प्रभाव आता कमी होत असून भाजपची संघटित ताकद हळूहळू वरचढ ठरत आहे, असा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी विकासकामांसह संघटनवाढीसाठी सक्रिय असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकारांशी संवाद साधताना गोरे म्हणाले की, सातारा जिल्ह्यावर यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार, किसन वीर, प्रतापराव भोसले, विलासराव पाटील उंडाळकर, लक्ष्मणराव पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विचारांचा प्रभाव राहिला. जिल्हा बँक, राज्य बँक तसेच साखर कारखान्यांवरील सत्ता याच राजकीय व्यवस्थेभोवती केंद्रित होती. बारामतीचे राजकीय समीकरण जिल्ह्यावर प्रभाव टाकत होते. मात्र २००७ नंतर परिस्थितीत बदल घडू लागला, असेही त्यांनी नमूद केले.
“माण तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून आलो. त्यानंतर अपक्ष म्हणून विधानसभेत विजय मिळवला. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय पकडीला आव्हान देण्याची प्रक्रिया सुरू झाली,” असे सांगत भाजपमध्ये प्रवेशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे मार्गदर्शन आणि पक्षाची भक्कम साथ मिळाल्याचे गोरे म्हणाले.
फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर, खंडाळ्यात अविनाश धायगुडे गट, शिरवळ-वाई परिसरात उभी राहिलेली संघटनात्मक ताकद आणि नगरपालिका निवडणुकांचे निकाल यामुळे विरोधकांचा प्रभाव कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला. वाईत भरगुडे पाटील, पिसाळ कुटुंबीय आणि नितीन सावंत यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत तुल्यबळ लढती होतील, असेही गोरे म्हणाले.
रामराजे नाईक निंबाळकर, शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांच्याशी झालेल्या दीर्घ राजकीय संघर्षाचा उल्लेख करत गोरे यांनी फलटण, कोरेगाव, कराड उत्तर-दक्षिण, रहिमतपूर आणि पाटण या भागांत भाजपची संघटनात्मक स्थिती मजबूत झाल्याचा दावा केला. पाटणमध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून भाजपला बळ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात प्रथमच बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील समन्वय स्पष्टपणे दिसून येत असून दोघांनीही जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केल्याचे चित्र आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणूक सातार्यातील राजकीय सत्तासमीकरणे बदलणारी ठरेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


