सांगली प्रतिनिधी
कीकडे सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदानाचा उत्साह दिसून येत असताना, तासगाव तालुक्यातील बलगवडे गावाने मात्र लोकशाही प्रक्रियेपासून दूर राहण्याचा टोकाचा निर्णय घेतला. गावात प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पासाठी झालेल्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीच्या निषेधार्थ संपूर्ण गावाने मतदानावर बहिष्कार टाकत आपला संताप व्यक्त केला.
राज्य सरकारच्या माध्यमातून बलगवडे येथील गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, या प्रकल्पासाठी कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्रामसभेची परवानगी न घेता सुमारे साडेबारा हजार वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने आणि श्रमाने ही झाडे लावून त्यांचे संगोपन केले होते. त्यामुळे या वृक्षतोडीमुळे केवळ पर्यावरणाचाच नव्हे, तर गावकऱ्यांच्या भावनिक नात्याचाही मोठा आघात झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
बलगवडे गावात सुमारे २३०० मतदार असून, निवडणूक प्रशासनाने दोन मतदान केंद्रांची व्यवस्था केली होती. मात्र सकाळी मतदान प्रक्रिया सुरू होऊनही दुपारपर्यंत एकही मतदार मतदानासाठी उपस्थित राहिला नाही. मतदान केंद्रांवर केवळ निवडणूक अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तैनात होते. गावाने घेतलेल्या या सामूहिक आणि आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष बलगवडेकडे वेधले गेले आहे.
ग्रामस्थांच्या मते, पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या शासनानेच इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून विरोधाभासी भूमिका घेतली आहे. “आम्ही पर्यावरणासाठी झाडे लावली, त्यांचे संवर्धन केले; मात्र सरकारी प्रकल्पाच्या नावाखाली ती तोडण्यात आली. हा सौर ऊर्जा प्रकल्प गावातून तात्काळ हलवून अन्यत्र उभारण्यात यावा,” अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे एकीकडे पर्यावरण संवर्धन आणि विकास प्रकल्प यांच्यातील संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला असून, दुसरीकडे प्रशासनाच्या नियोजन व संवाद प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लोकशाही प्रक्रियेतील सहभागाऐवजी बहिष्काराचा मार्ग स्वीकारावा लागणे ही बाब गंभीर असून, शासन आणि प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


