बीड प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील कपिलधार देवस्थान परिसरात अल्पवयीन मुलीचा होऊ घातलेला बालविवाह पोलिसांच्या सतर्कतेमुळे ऐनवेळी रोखण्यात आला. या कारवाईदरम्यान नवरदेवाने पळ काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यातील बालविवाहाच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना सकाळच्या सुमारास एक गोपनीय माहिती मिळाली. कपिलधार देवस्थान (ता. जि. बीड) येथे दुपारी १२ वाजता १६ वर्षीय मुलीचा विवाह लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पल्लवी जाधव यांनी साध्या वेशात आपल्या सहकाऱ्यांसह संबंधित ठिकाणी धाव घेतली.
देवस्थान परिसरात एकाच वेळी दोन ते तीन विवाहसोहळे सुरू असल्याने आणि मोठी गर्दी असल्याने संशय अधिक गडद झाला. पहिल्या हॉलमध्ये चौकशी करत असताना एका महिलेकडे वधूचे नाव विचारले असता, ते चुकीचे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांची टीम बाहेर पडण्याच्या तयारीत होती. मात्र, पुढील चौकशीत वधूचे आडनाव विचारले असता ते मिळालेल्या माहितीशी जुळत असल्याचे लक्षात आले.
याच आडनावावरून संशय बळावल्याने अधिक तपास करण्यात आला. अखेर संबंधित मुलगी हीच अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच, उपस्थित वऱ्हाडी मंडळींना पोलिस असल्याचा संशय आला आणि एकच गोंधळ उडाला. या गोंधळाचा फायदा घेत नवरदेवाने घटनास्थळावरून पळ काढला.
गर्दीमध्येही पल्लवी जाधव यांनी प्रसंगावधान राखत पीडित मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले. उपस्थितांना बालविवाह प्रतिबंध अधिनियमाबाबत मार्गदर्शन करत, अशा प्रकारचे विवाह कायद्याने गुन्हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलीचे समुपदेशन करून तिला विश्वासात घेण्यात आले. मात्र, मुलीचे आई-वडील, मामा तसेच नवरदेव राजेंद्र शिंदे व त्याचे पालक फरार झाल्याने त्यांच्या नातेवाइकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीड जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना वारंवार समोर येत असताना, सातत्याने जनजागृती करूनही असे प्रकार का थांबत नाहीत, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, व्हायरल व्हिडीओही पुरावा म्हणून तपासात समाविष्ट करण्यात आला आहे.


