नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) या सर्वोच्च नागरी सेवांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) महत्त्वाचे नियमबदल जाहीर केले आहेत. नागरी सेवा परीक्षा २०२६ (Civil Services Examination – CSE 2026) साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत आयोगाने पात्रता, प्रयत्न (Attempts) आणि सेवेत असलेल्या उमेदवारांबाबत स्पष्ट आणि कठोर भूमिका मांडली आहे.
UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर ही अधिसूचना उपलब्ध असून, या बदलांचा थेट परिणाम सध्या सेवेत असलेल्या तसेच पुन्हा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांवर होणार आहे. आयोगाने हे बदल स्पर्धेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि संधींचा गैरवापर टाळण्यासाठी केल्याचे स्पष्ट केले आहे.
नवे नियम काय सांगतात?
एकदाच अतिरिक्त संधी
२०२५ किंवा त्यापूर्वीच्या कोणत्याही वर्षी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना २०२६ किंवा २०२७ पैकी केवळ एकदाच नागरी सेवा परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. ही संधी पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी असून, त्यासाठी सेवेतून राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. मात्र २०२८ ची परीक्षा द्यायची असल्यास उमेदवाराला आधी नियुक्त सेवेतून राजीनामा द्यावा लागेल.
IAS–IFS उमेदवारांना बंदी
नव्या नियमानुसार, मागील निकालात IAS किंवा IFS मध्ये नियुक्ती होऊन त्या सेवेचा सदस्य राहिलेला उमेदवार नागरी सेवा परीक्षा २०२६ साठी पात्र राहणार नाही. म्हणजेच एकदा या दोन सेवांमध्ये अंतिम नियुक्ती झाली असेल, तर पुन्हा CSE देण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे.
पूर्व परीक्षा पास असूनही मुख्य परीक्षा नाही
जर IAS किंवा IFS सेवेत असलेला उमेदवार नागरी सेवा पूर्व परीक्षा (Prelims) उत्तीर्ण झाला, तरीही त्याला मुख्य परीक्षा (Mains) देण्याची परवानगी दिली जाणार नाही. सेवेत असताना परीक्षा देऊन उच्च सेवा मिळवण्याचा प्रयत्न यामुळे थांबवण्यात आला आहे.
नियुक्ती झाल्यास इतर सेवांचा मार्ग बंद
नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२६ सुरू झाल्यानंतर, पण अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वी एखाद्या उमेदवाराची IAS किंवा IFS मध्ये नियुक्ती झाली आणि तो त्या सेवेचा सदस्य म्हणून कार्यरत राहिला, तर CSE २०२६ च्या निकालाच्या आधारे त्याचा इतर कोणत्याही सेवेसाठी किंवा पदासाठी विचार केला जाणार नाही.
स्पर्धात्मक परीक्षेतील निर्णायक टप्पा
UPSC चे हे नियमबदल नागरी सेवा परीक्षेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानले जात आहेत. ‘एकाच उमेदवाराने अनेक संधी अडवू नयेत’ आणि ‘नव्या उमेदवारांना समान संधी मिळावी’ या भूमिकेतून आयोगाने ही पावले उचलल्याचे जाणकारांचे मत आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या नियमांचा बारकाईने अभ्यास करूनच पुढील नियोजन करावे, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.


