वृत्तसंस्था:
हरारेच्या हसीरेच्या मैदानावर भारतीय क्रिकेटने पुन्हा एकदा आपली बादशाही सिद्ध केली. आयसीसी पुरुष अंडर-19 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा तब्बल 100 हून अधिक धावांनी धुव्वा उडवत विक्रमी सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीमुळे आणि गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे हा विजय केवळ मोठा नाही, तर स्मरणात राहील असा ठरला.
📸 📸
Moments they will never forget! 🙌
Let the celebrations begin 🇮🇳#U19WorldCup pic.twitter.com/wGpdChSbWW
— BCCI (@BCCI) February 6, 2026
वैभवचा महापराक्रम!
या अंतिम सामन्याचा खरा हिरो ठरला तो वैभव सूर्यवंशी. अवघ्या 80 चेंडूंमध्ये 175 धावांची वादळी खेळी, त्यात 15 चौकार आणि 15 षटकार, अशी तोडफोड त्याने केली की इंग्लंडचे गोलंदाज अक्षरशः हतबल झाले. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ही खेळी अनेक वर्षे आठवली जाईल.
कर्णधाराची जबाबदारी, म्हात्रेंची फिफ्टी
कर्णधार आयुष म्हात्रे यानेही जबाबदारीची खेळी करत शानदार अर्धशतक झळकावलं. वैभव आणि म्हात्रे यांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने इंग्लंडसमोर 412 धावांचं डोंगराएवढं आव्हान उभं केलं.
इंग्लंडचा पाठलाग, पण भारतीय माऱ्यासमोर नतमस्तक
या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातच डगमगती झाली. जोसेफ मूर्स लवकर बाद झाला. त्यानंतर बेन डॉकिन्स आणि बेन मेस यांनी दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी करत आशा निर्माण केली. मात्र खिलान पटेलने मेसला बाद करत सामना पुन्हा भारताच्या बाजूने झुकवला.
मेसने 27 चेंडूत 45 धावांची झंझावाती खेळी केली, तर थॉमस रेव 31 धावांवर माघारी परतला. बेन डॉकिन्स याने 66 धावांची झुंजार खेळी केली, पण दुसऱ्या टोकाला साथ मिळाली नाही.
गोलंदाजांचा खोचक मारा
भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध आणि आक्रमक मारा करत इंग्लंडला 40.2 षटकांत 311 धावांवर रोखलं. अखेर भारताने 107 धावांनी दणदणीत विजय साकारत ट्रॉफी उंचावली.
सहाव्यांदा विश्वविजेते!
या विजयासह भारताने अंडर-19 विश्वचषक सहाव्यांदा जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. ही केवळ ट्रॉफी नाही, तर भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्याची पावती आहे.
हरारेच्या मैदानावर घुमलेला हा विजयाचा नाद, वैभवाची बॅटिंग, कर्णधाराची संयमी खेळी आणि गोलंदाजांची धार
भारतीय क्रिकेटचं ‘वैभव’ पुन्हा एकदा जगासमोर झळकलं!


