मुंबई प्रतिनिधी
इंधन आणि सुटे भागांच्या वाढत्या किमतींचा दाखला देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदाही दोन टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, हा प्रस्ताव परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. “भाडेवाढ नव्हे, आधी बसेस वेळेवर धावू द्या,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
गेल्या वर्षी १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यात आल्यानंतर प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त झाली होती. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा भाडेवाढ करण्याचा विचार चुकीचा ठरेल, असे संकेत सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून, तिचा कणा म्हणजे किफायतशीर दर आणि विश्वासार्ह सेवा, असे सांगत सरनाईक यांनी वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. “बसेस वेळेवर धावल्या, तरच प्रवाशांचा विश्वास टिकेल आणि उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
दैनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात बिघाड होणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे, याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आगार पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळेत सुटेल, याची खात्री करावी, असे आदेशही त्यांनी दिले.
“प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना खासगी पर्यायांकडे ढकलणे,” असा इशाराही सरनाईक यांनी दिला. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे हक्काचा प्रवासी दूर जात असल्याचे वास्तव प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
उत्पन्नवाढीसोबतच खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त करत, स्थानिक पातळीवरील नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.
“वक्तशीरपणाच एसटीची नवी ओळख ठरली पाहिजे,” असे सांगत, वेळेवर धावणारी, प्रवाशांचा विश्वास जपणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी एसटी उभारणे हाच पुढील वाटचालीचा मंत्र असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.


