मुंबई प्रतिनिधी
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमधील प्रवाशांतील वाढते वाद आणि आक्रमकता आता गंभीर स्वरूप धारण करू लागली आहे. वांद्रे स्थानकात दोन प्रवाशांतील किरकोळ वादाचा फटका थेट तिसऱ्या, निष्पाप प्रवाशाला बसला असून दगडफेकीत त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी अवघ्या ३२ तासांत आरोपीला अटक केली आहे.
दादर येथे राहणारे निशांत खत्री ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री अंधेरीहून दादरकडे जाणाऱ्या फास्ट लोकलने प्रवास करत होते. रात्री सुमारे अकराच्या सुमारास ही लोकल वांद्रे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवर थांबली असता, त्याच डब्यात जागेवरून दोन प्रवाशांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. गाडी स्थानकात असतानाच वादातील एक प्रवासी संतप्त अवस्थेत खाली उतरला.
रागाच्या भरात त्याने रेल्वे ट्रॅकवरील मोठा दगड उचलून चालत्या डब्याच्या दिशेने भिरकावला. दुर्दैवाने हा दगड वादाशी कोणताही संबंध नसलेल्या निशांत खत्री यांच्या डोळ्याला जोरात लागला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे डब्यात गोंधळ उडाला. रक्तबंबाळ अवस्थेत निशांत यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेनंतर वांद्रे रेल्वे पोलिसांनी निशांत खत्री यांचा जबाब नोंदवून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम. बी. बच्छाव आणि त्यांच्या पथकाने स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान संशयित आरोपी दादर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी सापळा रचून योगेंद्र वंशराज 26या.ला ताब्यात घेतले. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून सध्या वसई येथे मजुरीचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चौकशीत आरोपीने रागाच्या भरात दगड फेकल्याची कबुली दिली आहे.
लोकल प्रवासादरम्यान होणारे वाद, भांडणे आणि त्यातून घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.


