मुंबई प्रतिनिधी
म्हाडाच्या घरविक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकीय प्रणाली अत्यंत सक्षम आणि पारदर्शक असल्याचा दावा सातत्याने केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र त्याच प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे एकामागून एक योजना रखडत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. पुणे मंडळाची सोडत महिनोनमहिने प्रलंबित असतानाच, आता मुंबई मंडळाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेलाही तांत्रिक अडचणींचा फटका बसला आहे.
मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील १२० रिक्त घरांच्या विक्रीसाठी गुरुवार, ५ फेब्रुवारीपासून अर्ज नोंदणी सुरू होणार होती. मात्र, संगणकीय प्रणालीतील अडचणींमुळे ही नोंदणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती म्हाडाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. विशेष म्हणजे, ही प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होणार, याबाबत कोणतीही स्पष्टता मंडळाने दिलेली नाही. त्यामुळे सोडतीशिवाय घर मिळविण्याची अपेक्षा असलेल्या इच्छुकांना आता प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
मुंबई मंडळाच्या सोडतीतील मध्यम व उच्च उत्पन्न गटातील घरे महागडी असल्याने ती विकली जात नसल्याचे वास्तव आहे. घरांच्या किमती आणि सर्वसामान्यांचे उत्पन्न यातील तफावत मोठी असल्याने या गटातील अनेक घरे रिक्त राहिली आहेत. हीच घरे ‘प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत विक्रीस काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ मध्ये ही विक्री सुरू होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे ही योजना प्रत्यक्षात येण्यास विलंब होत राहिला.
अखेर मंगळवारी मुंबई मंडळाने १२० घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार ‘बुक माय होम’ या संकेतस्थळावर ५ ते १२ फेब्रुवारीदरम्यान अर्ज नोंदणी होणार होती. अर्जदारांना पसंतीचे घर निवडून अनामत रक्कम भरल्यानंतर ४८ तासांत घराच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम भरणे अपेक्षित होते. ही रक्कम वेळेत भरल्यास घराचे वितरण निश्चित होणार होते, तर उर्वरित ९० टक्के रक्कम पुढील ९० दिवसांत भरल्यानंतर प्रत्यक्ष ताबा देण्यात येणार होता.
मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होण्याआधीच तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत अर्ज नोंदणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ ही संकल्पनाच सध्या प्रतीक्षेत अडकली असून, म्हाडाच्या संगणकीय व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


