मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्रीपदाचा औपचारिक पदभार स्वीकारणार आहेत. ३१ जानेवारी रोजी ‘लोकभवन’ येथे साधेपणाने शपथ घेतल्यानंतर प्रथमच त्या मंत्रालयीन कामकाजात सहभागी होणार आहेत.
बारामतीहून सकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार सिद्धिविनायक मंदिर आणि चैत्यभूमी येथे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी यांच्या निवासस्थानी जाऊन त्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत. त्यानंतर त्या मंत्रालयात दाखल होऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
सुनेत्रा पवार यांच्याकडे अल्पसंख्याक विकास, क्रीडा आणि उत्पादन शुल्क ही तीन खाती सोपविण्यात आली आहेत. हीच खाती यापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होती. अर्थ खाते मात्र सध्या त्यांच्याकडे देण्यात आलेले नाही. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांनी कराड येथे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. तसेच विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अजित पवार यांचे अंगरक्षक विदिप जाधव यांच्या फलटण तालुक्यातील गावी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यानंतर त्या बारामतीत मुक्कामी होत्या.
२८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे बारामतीजवळील विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत, ३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. शपथविधी अत्यंत घाईघाईत झाल्याने त्यावेळी राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. पतीच्या निधनानंतर चौदाव्या दिवशी त्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारत आहेत.
दिवंगत अजित पवार यांचे मंत्रालयातील मुख्य इमारतीतील सहाव्या मजल्यावरील दालन सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहे. त्यांच्या नावाची पाटी मंगळवारी दालनाबाहेर लावण्यात आली. अजित पवार यांच्या कार्यकाळात मंत्री आस्थापनेवर असलेले सर्व कर्मचारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच पूर्ववत कामकाज पाहणार आहेत.
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत २८ मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली असली, तरी राज्याला आजवर एकही महिला उपमुख्यमंत्री लाभली नव्हती. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. मंगळवारी त्या प्रथमच मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपस्थित राहणार असून उपमुख्यमंत्री म्हणून त्या कोणता पहिला निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


