मुंबई प्रतिनिधी
मुंबई विमानतळावरील ओमेगा एंटरप्रायझेस (पार्किंग विभाग) या कंपनीतील कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी भारतीय कामगार सेनेने पुढाकार घेतला. संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
ओमेगा एंटरप्रायझेसमध्ये कार्यरत असलेले गोविंद बागवे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबास मदत मिळावी यासाठी भारतीय कामगार सेनेने मियाल व्यवस्थापनासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर कंपनीकडून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, कंपनीतील कामगारांनी सामाजिक बांधिलकीतून एक लाख २६ हजार रुपये जमा केले. अशा प्रकारे एकूण तीन लाख २६ हजार रुपयांचा धनादेश गोविंद बागवे यांच्या पत्नीला भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या वेळी संजय कदम यांनी, संकटाच्या काळात भारतीय कामगार सेना कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस राजा ठाणगे, सहचिटणीस मिलिंद तावडे, युनिट कमिटीचे आनंद बैले, गिरीश तेली, सचिन शिंदे, नितीन सावंत, विठ्ठल अडागळे तसेच बागवे कुटुंबातील सिद्धी बागवे, अनिल बागवे आणि रुपेश बागवे उपस्थित होते.


