मुंबई प्रतिनिधी
म्हाडाच्या मुंबई मंडळाने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या नव्या योजनेअंतर्गत १२० घरांच्या विक्रीसाठी मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध केली. गुरुवार, ५ फेब्रुवारीपासून या घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. सोडतीशिवाय घर मिळणार, असा दावा करण्यात येत असला तरी या योजनेतील घरांच्या किंमती सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या योजनेतील बहुतांश घरे दोन कोटींपासून ते आठ कोटी रुपयांपर्यंतच्या किंमतींची आहेत. ताडदेव येथील घराची किंमत तब्बल आठ कोटी रुपये ठेवण्यात आली असून वडाळ्यातील घरासाठी ४२ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. २०२४ मधील सोडतीत ज्या घरांच्या किंमती तुलनेने कमी होत्या, त्याच घरांच्या किंमती आता वाढवण्यात आल्याचे दिसून येते.
मुंबई मंडळाच्या मागील सोडतींमध्ये काही महागडी घरे विक्रीअभावी तशीच राहिली होती. ही घरे दोन किंवा अधिक वेळा सोडतीत समाविष्ट करूनही विकली गेली नव्हती. अखेर हीच घरे ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. मुंबईत प्रथमच अशा स्वरूपात या योजनेअंतर्गत घरविक्री करण्यात येत आहे.
नोंदणी प्रक्रिया ‘बुक माय होम’ या संकेतस्थळावरून करण्यात येणार असून नोंदणीनंतर पाच ते सहा दिवसांत घरविक्रीला सुरुवात होईल. प्रथम नोंदणी करून अनामत रक्कम भरणाऱ्या अर्जदारास घर दिले जाणार आहे. मात्र अनामत रक्कम भरल्यानंतर ४८ तासांच्या आत घराच्या एकूण किमतीपैकी १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. तसे न केल्यास संबंधित अर्जदाराचा दावा रद्द होऊन पुढील इच्छुकास संधी दिली जाणार आहे.
या अटींमुळे इच्छुकांना अवघ्या आठवड्याभरात लाखो रुपयांची अनामत रक्कम तसेच कोट्यवधींच्या घरासाठी १० टक्के आगाऊ रक्कम उभी करावी लागणार आहे. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात उच्च उत्पन्न गटासाठीच असल्याची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे २०२४ च्या सोडतीत ताडदेवमधील सुमारे १,५०० चौरस फुटांचे घर साडेसहा ते सव्वासात कोटी रुपयांत उपलब्ध होते. त्याच घराची किंमत आता आठ कोटी रुपये करण्यात आली आहे. वडाळ्यातील ४० लाखांचे घर ४२ लाखांवर पोहोचले असून जुहू, जेव्हीपीडी, लोअर परळ आदी भागांतील घरांच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे.
अनामत रक्कम एक ते सहा लाख रुपये
सामान्यतः म्हाडाच्या सोडतीत उत्पन्न गटानुसार १५ हजार ते दीड लाख रुपये अनामत रक्कम आकारली जाते. मात्र ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत थेट एक ते सहा लाख रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर घराच्या किमतीच्या १० टक्के रक्कम भरण्याची अट असल्याने सर्वसामान्यांसाठी आर्थिक अडथळे अधिक वाढणार आहेत.
१२ फेब्रुवारीपासून घरविक्री
मुंबईतील १२० घरांसाठी गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून नोंदणी सुरू होणार असून १२ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष घरविक्रीला सुरुवात होईल. या योजनेतील शेवटचे घर विकले जाईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील, अशी माहिती मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.


