सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पर्यटकांचे आवडते आणि ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. आल्हाददायक हवामान, हिरवीगार निसर्गरचना आणि स्ट्रॉबेरीच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेल्या या पर्यटनस्थळावर गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारामुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुट्टीच्या काळात मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून हजारो पर्यटक महाबळेश्वरला दाखल होतात. मात्र अलीकडेच महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरातील रस्त्यांवर बिबटे दिसल्याच्या घटना समोर आल्या असून, काही ठिकाणी वन्यप्राणी थेट वस्तीत आणि घरांमध्ये शिरल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पाचगणीहून महाबळेश्वरकडे येणाऱ्या जननी माता मंदिर घाट परिसरात रस्त्याच्या कडेला बिबट्या बसलेला आढळल्याची घटना घडली. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरून एक अवाढव्य जंगली गवा अत्यंत निवांतपणे फिरताना दिसला. या दृश्यामुळे बाजारपेठेत क्षणातच गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
विशेष म्हणजे, या भागापासून काही अंतरावर स्ट्रॉबेरीच्या शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याचा जंगली गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा धोका अधिक गंभीर होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
महाबळेश्वरची मुख्य बाजारपेठ रात्री उशिरापर्यंत, साधारण दहा वाजेपर्यंत पर्यटकांनी गजबजलेली असते. अशा वेळी जर हा जंगली गवा किंवा अन्य हिंसक वन्यप्राणी गर्दीच्या वेळेत बाजारात दाखल झाला असता, तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
याशिवाय, मुख्य बाजारपेठेपासून काही अंतरावर असलेल्या सुनीला भाटिया यांच्या बंगल्यात बिबट्या घुसल्याची घटनाही समोर आली होती. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच पर्यटकांनी आणि स्थानिकांनी विशेष दक्षता घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


