पुणे प्रतिनिधी
पुण्यातील ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळख असलेले सनी नाना वाघचौरे यांना बिश्नोई गँगकडून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास मुंबईतील माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यासारखी हत्या करण्याची धमकी देण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
बिश्नोई गँगमधील शुभम लोणकर याने ही धमकी दिल्याचा आरोप सनी वाघचौरे यांनी केला असून, याप्रकरणी त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच स्वतःच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षणाचीही मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.२२ वाजता एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून सनी वाघचौरे यांना व्हॉट्सॲप कॉल आला होता. हा कॉल न उचलल्यानंतर ‘शुभम लोणकर कॉल मी’ असा संदेश पाठवण्यात आला. त्यानंतर आलेला कॉल उचलल्यावर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख ‘बिश्नोई गँगमधील शुभम लोणकर’ अशी करून दिली. “गुगलवर सर्च करून बघ, बिश्नोई गँग कोण आहे ते. पुढे मेसेजवर बोलेन,” असे सांगत त्याने फोन बंद केला.
यानंतर वेगवेगळ्या क्रमांकांवरून वारंवार कॉल येऊ लागले. सुरुवातीला हा प्रकार गांभीर्याने न घेतल्याचे सनी वाघचौरे यांनी सांगितले. मात्र २६ जानेवारी रोजी सकाळी ७.२१ वाजता आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून थेट धमकीचा संदेश आला. या संदेशात पाच दिवसांत खंडणीची रक्कम न दिल्यास बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसारखी कारवाई केली जाईल, असा थेट इशारा देण्यात आला आहे.
या धमकीमुळे सनी वाघचौरे भयभीत झाले असून, त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. संबंधित आंतरराष्ट्रीय क्रमांकांचा माग काढण्याचे काम सुरू असून, सायबर पथकाची मदतही घेण्यात येत आहे.
सनी वाघचौरे हे सामाजिक कार्यक्रम, सार्वजनिक सोहळे आणि विविध प्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये दोन ते तीन किलो सोन्याचे दागिने परिधान करून उपस्थित राहत असल्यामुळे ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियावरही त्यांचा मोठा चाहता वर्ग असून, त्यांना कोट्यवधी फॉलोअर्स आहेत.
दरम्यान, बिश्नोई गँगकडून देशातील विविध सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांना खंडणी व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या असून, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या धाडसाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.


