पुणे प्रतिनिधी
पुणे महापालिकेच्या महापौरपदावर भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची निवड निश्चित झाली असून ही निवड बिनविरोध होणार आहे. त्यामुळे महापौर निवडणूक केवळ औपचारिक ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या राजकीय चर्चेनुसार महापौर-उपमहापौर पदासाठी बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न देता आपला शब्द पाळल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिंहगड रोड परिसराला प्रथमच पुणे महापालिकेच्या महापौरपदाचा मान मिळणार असून, हा त्या भागासाठी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. मंजूषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून, यंदाच्या निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली होती. महापालिकेतील प्रशासन आणि राजकारणाचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर प्रभावीपणे काम केले आहे.
महापौरपदासाठी भाजपकडून रंजना टिळेकर, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, आमदार योगेश टिळेकर यांना विधानसभेची संधी मिळाल्यामुळे त्यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांचे नाव अंतिम यादीतून वगळण्यात आल्याचे समजते. तसेच मानसी देशपांडे या आमदार व राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भावजयी असल्याने त्यांना महापौरपद देण्यात आले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मंजूषा नागपुरे या कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आणि भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. संघटनात्मक बांधिलकी, प्रशासनाचा अनुभव आणि पक्षातील विश्वासार्हता या सर्व बाबी त्यांच्या निवडीस कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ११९ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. यंदा पुण्याचे महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठ्या प्रमाणावर महिलांना उमेदवारी दिली होती. तब्बल ११९ महिलांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यापैकी ५० पेक्षा अधिक महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
दरम्यान, पुणे महापालिकेतील पक्षनिहाय बलाबल पुढीलप्रमाणे आहे –
भाजप ११९, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २७, काँग्रेस १५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ३, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) १ जागेवर समाधान मानावे लागले आहे.
राजकीय समन्वय, बिनविरोध निवड आणि महिलांना नेतृत्वाची संधी या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेची ही महापौर निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.


