बंगळूर:
लॉटरी तिकीट व्यवहाराच्या सेटलमेंटसाठी लाच मागणाऱ्या पोलीस निरीक्षकाला लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची खळबळजनक घटना बंगळूरमध्ये उघडकीस आली. केपी अग्रहार पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोविंदराजू यांनी पाच लाख रुपयांची मागणी करून चार लाख रुपये स्वीकारत असतानाच लोकायुक्तांच्या पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. अटकेदरम्यान त्यांनी केलेल्या तीव्र प्रतिकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
लोकायुक्त पोलिसांच्या माहितीनुसार, लॉटरी तिकीट व्यवहाराशी संबंधित प्रकरणात वाद मिटवून देण्यासाठी तसेच ‘बड्स’ (BUDS) कायद्यांतर्गत गुन्हा टाळण्यासाठी गोविंदराजूंनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी एक लाख रुपये आधीच स्वीकारण्यात आले होते. उर्वरित चार लाख रुपये बंगळूरमधील सीएआर ग्राउंड परिसरात आणण्यास सांगण्यात आले होते.
या प्रकाराला कंटाळून तक्रारदाराने लोकायुक्तांकडे धाव घेतली. त्यानंतर लोकायुक्तांचे पोलीस अधीक्षक शिवप्रकाश देवराजू यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे गोविंदराजू चार लाख रुपये स्वीकारत असतानाच लोकायुक्त पोलिसांनी त्यांना घेरले.
अटकेच्या वेळी निरीक्षकाने पकड टाळण्यासाठी जोरदार प्रतिकार केला. सहा अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, गोविंदराजू आरडाओरड करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा सारा प्रकार पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती. अखेर लोकायुक्त पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
तक्रारदार सूरज यांनी सांगितले की, “मला वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून त्रास दिला जात होता. केसमधून बाहेर पडण्यासाठी एसीपी चंदन यांना पैसे द्यावे लागतील, असे गोविंदराजूंनी सांगितले. पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा होती; मात्र वास्तव वेगळेच निघाले.” मोहम्मद अकबर यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
लोकायुक्त पोलिस अधीक्षक शिवप्रकाश देवराजू यांनी सांगितले की, “भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पाच लाख रुपयांची मागणी करून चार लाख स्वीकारत असताना संबंधित निरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले. प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.”
या घटनेमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, लोकायुक्तांच्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.


