मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्रिपदासाठी अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी सुनेत्रा पवार उद्या, शुक्रवारी सायंकाळी शपथ घेणार असून, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींना आज निर्णायक वळण मिळाले. उद्या सकाळी अकरा वाजता पक्षाच्या सर्व आमदारांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी राजभवनात सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.
या निर्णयापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत सत्तासमीकरणे आणि पुढील राजकीय दिशा यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. बैठकीनंतर उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर सहमती झाली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून, दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे. उद्याच्या आमदार बैठकीत गटनेत्याची निवड, पक्षातील समन्वय आणि आगामी अधिवेशनातील भूमिका यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नेतृत्वातील स्थैर्य मिळेल, तसेच राज्याच्या राजकारणात महिला नेतृत्वाचा एक नवा अध्याय सुरू होईल, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.


