वसई : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह व अर्वाच्च भाषेत टीका करणाऱ्या एका तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी शोधून काढून मारहाण केल्याची घटना वसई-नालासोपारा परिसरात घडली. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने कोणत्याही थराला जाऊन टीका करण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. नालासोपारा येथील एका तरुणाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्दांचा वापर करत टीकात्मक व्हिडीओ तयार करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित केला होता. ही पोस्ट प्रसारित होताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
त्यानंतर संबंधित तरुणाचा शोध घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून बाहेर काढून मारहाण केली आणि धिंड काढल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर झळकू लागले. या प्रकारामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, मनसेच्या ‘मनसे रिपोर्ट’ या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे. “केवळ ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल अर्वाच्च भाषेत टीका व शिवीगाळ करण्यात आली होती. टीका एका मर्यादेपर्यंत सहन केली जाऊ शकते; मात्र प्रसिद्धीसाठी सातत्याने खालच्या पातळीवर जाणाऱ्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्र सैनिकांनी संबंधित तरुणाची धिंड काढली,” असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे समाजमाध्यमांवरील व्यक्तिस्वातंत्र्य, जबाबदारी आणि कायद्याची भूमिका यावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.


