नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारत आणि युरोपियन संघ (EU) यांच्यातील बहुप्रतिक्षित मुक्त व्यापार करारावर सह्या झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गोव्यात सुरू असलेल्या इंडिया एनर्जी वीक कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी या कराराचे वर्णन “मदर ऑफ ऑल डील्स” असे केले. हा करार भारतासह युरोपियन संघातील कोट्यवधी नागरिकांसाठी मोठ्या आर्थिक संधी घेऊन येणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH | Prime Minister Narendra Modi says, "…Manufacturing will get a huge boost from this trade deal with the EU, and the services sector will also expand. The Free Trade Agreement will boost the confidence of every investor and businessman to invest in India…"
Source: DD) pic.twitter.com/aBwnRpVZrR
— ANI (@ANI) January 27, 2026
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतावर जागतिक पातळीवर विश्वास वाढला आहे. भारत ऊर्जा विकास, वाहतूक आणि पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत असून, शाश्वत विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे. इंडिया एनर्जी वीकच्या नव्या आवृत्तीत १२५ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले असून, ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वत भविष्यासंदर्भात सखोल चर्चा होत आहे.
भारत–युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराबाबत पंतप्रधानांनी सांगितले की, हा करार जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील समन्वयाचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) सुमारे २५ टक्के आणि जागतिक व्यापाराच्या जवळपास एक तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व हा करार करतो. लोकशाही मूल्ये आणि रूल ऑफ लॉबाबतची कटिबद्धताही या करारामुळे अधिक दृढ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारत जगातील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सक्षम असल्याचे नमूद करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीमध्ये भारत जगातील अव्वल पाच देशांपैकी एक आहे. १५० हून अधिक देशांमध्ये भारतातून निर्यात होत असून, ही क्षमता आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरणारी आहे.
भारताची रिफायनिंग क्षमता सध्या जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर असून, लवकरच ती पहिल्या क्रमांकावर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. “रिफायनिंग क्षमता वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. ही क्षमता वाढल्यास गुंतवणूकदारांसाठी भारत अधिक आकर्षक ठरेल,” असेही त्यांनी नमूद केले.
भारत–युरोपियन संघ मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.


