सातारा प्रतिनिधी
आपल्या मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्याची क्षमता भाजपकडेच असून, विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता भाजप उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्णे गटातील भाजपचे अधिकृत उमेदवार वैभव चव्हाण, वर्णे गणाच्या उमेदवार साक्षी माने आणि अपशिंगे गणातील उमेदवार मानसिंग मोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
भोसले म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना केवळ कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असून त्याचा लाभ तळागाळातील गरजू घटकांना मिळत आहे.
यावेळी आमदार मनोज घोरपडे यांनी वर्णे गट, गण आणि अपशिंगे गणातील विकासकामांचा आढावा घेतला. परिसरातील मूलभूत सुविधांना गती देण्यासाठी भाजप उमेदवारांना निवडून देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभेला डॉ. अरुणा बर्गे, अजिंक्यतारा कारखान्याचे माजी अध्यक्ष रामभाऊ जगदाळे, राज्य सहकार संघाचे संचालक धनंजय शेडगे कदम, विजयराव काळे, शेडगे बापू, विजय घोरपडे, माजी संचालक सुरेश माने, सुनील काटे, संजय निकम, अॅड. धनाजी जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, बांधकाममंत्री म्हणून बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वर्णे (आबापुरी) येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानाच्या परिसरातील रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. अपशिंगे ते अंगापूर दरम्यानचा अरुंद व खराब झालेला रस्ता ऊस वाहतूक व दैनंदिन वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. “श्री काळभैरवनाथांच्या साक्षीने शब्द देतो, येत्या काळात या मार्गाचे रुंदीकरण करून संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात येईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.


