सातारा प्रतिनिधी
प्रेमसंबंधांच्या गुंतागुंतीतून फलटण तालुक्यात एक धक्कादायक खूनप्रकरण उघडकीस आले आहे. पत्नीने आपल्या पती व जुन्या प्रियकराच्या मदतीने नव्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला असून, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ते नीरा नदी व शेततळ्यात टाकण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
सतीश उर्फ आप्पा दादासो दडस (रा. सोमंथळी, ता. फलटण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रेश्मा लखन बुधावले, तिचा पती लखन बंडू बुधावले आणि तिचा जुना प्रियकर सतीश तुकाराम माने (रा. विडणी, ता. फलटण) यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश दडस १४ जानेवारीपासून बेपत्ता होता. त्याचा भाऊ सागर दडस यांनी २१ जानेवारी रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, सतीशच्या मालकाकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
तपासात असे निष्पन्न झाले की, मकरसंक्रांतीच्या दिवशी सतीश दडस याचा लखन बुधावले आणि सतीश माने यांच्याशी वाद झाला होता. या वादात लखन बुधावले याने लोखंडी रॉडने सतीशच्या डोक्यात प्रहार केल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचाराच्या बहाण्याने त्याला विडणी परिसरात नेण्यात आले. त्यानंतर धुळदेव गावाच्या हद्दीतील भिवरकरवाडी परिसरात दगडाने डोक्यात मारून त्याची हत्या करण्यात आली.
हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी लाकूड कापण्याच्या मशीनच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे दोन पोत्यांमध्ये भरून एक पोते नीरा नदीत, तर दुसरे पोते शेततळ्यात टाकण्यात आले. पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोन्ही ठिकाणांहून मृतदेहाचे तुकडे जप्त केले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप जगताप करीत असून, या घटनेमुळे फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.


